Ad will apear here
Next
आठवणीतला हंडा आणि स्मरणरम्य आंघोळ


गणपतीत सालाबादप्रमाणे गावाला गेलो होतो...माणगाव...सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक नयनरम्य गाव...अगदी कोकणातलं टिपिकल...कौलारू घरं, गणपतीच्या दरम्यान सगळीकडे पसरलेली हिरवीगार भातशेती, खाचरांतून वाहत असलेल्या पाण्याचा मंजुळ आवाज, सोबतीला पावसाची गाज, इत्यादी इत्यादी...

पूर्वी वर्षातून दोन-तीनदा हमखास जाणं व्हायचं, आता मात्र नोकरीमुळे त्यावर बंधनं आलीयत. गणपतीत मात्र एखादा दिवस का होईना, जाणं होतंच. दोन फेऱ्यांतलं अंतर वाढल्यानं दरवेळेला गेल्यानंतर गावात, घरात झालेले कोणते-ना-कोणते तरी बदल पाहायला मिळतात, लगेच लक्षातही येतात. गावात कुठेतरी नव्या बिल्डिंग उभारलेल्या दिसतात, काही जुनी घरं गायबच झालेली असतात, रस्तारुंदीकरणासारख्या भानगडीत काही जुन्या झाडांनी राम म्हटलेला असतो...सध्याच्या भाषेत सांगायचं तर गावाचा होत असलेला ‘विकास’ अगदी नजरेत भरतो. वर्षभरात गावातल्या आणखी काही जाणत्यांनी इहलोकीची यात्रा संपवलेली असते, तर काही नव्या जिवांनी पहिला श्वास घेतलेला असतो. अर्थात असे बदल होतच असतात. फक्त बऱ्याच काळानंतर गेल्यामुळे ते लगेच जाणवतात, इतकंच काय ते.

आमचं घर खूप जुनं आहे. त्यामुळे ठरावीक अंतराने त्यात काहीतरी सुधारणा, बदल करावेच लागतात. यावेळी गेलो तेव्हा घरात जाणवलेला ठळक बदल म्हणजे न्हाणीघरातल्या पाणी तापवायच्या मोठ्या हंड्याऐवजी आलेला बंब. आमच्या घरातलं न्हाणीघर म्हणजे अगदी जुन्या काळाची आठवण करून देणारं...मोठी चूल, त्यावर फार मोठा तांब्याचा हंडा. मोठा म्हणजे किती..तर त्याची उंची असेल साधारण साडेतीन-चार फुटांपर्यंत आणि किमान दोन-अडीचशे लिटर तरी पाणी त्यात मावत असेल. या हंड्याच्या शेजारीच आंघोळ करायची जागा आहे...त्याला बाथरूम म्हणू...हंड्याच्या अगदी शेजारी फूटभर उंचीचा पाया आणि दोन-अडीच फूट उंचीचा बांध घालून केलेलं अडीच-तीन फुटांच्या लांबी-रुंदीचं हे चौकोनी बाथरूम, अशी जुन्या पद्धतीची रचना आहे. आंघोळीसाठी गरम पाणी शेजारच्या हंड्यातून थेट घेता यावं, यासाठी ही सोय..गरम पाणी संपलं, तरी बाथरूमच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या डोणीतल्या पाण्याची भर हंड्यात घातली की लगेच गरम पाणी उपलब्ध, कारण चूल पेटलेलीच असायची ना. सगळं कसं जागच्या जागी...या चुलीच्या एका बाजूला बाथरूम आणि तर दुसऱ्या बाजूला शेणी, गोवऱ्या, लाकडं, सळपं असा सगळा जळाऊ माल कोपऱ्यात ठेवलेला असायचा. त्याच्याच मागे अगदी कोपऱ्यात पहारही असायची (तिथे कशालाही लागत नसली तरीही). चुलीच्या जवळ रॉकेलची फनेल (स्थानिक भाषेत पुनेल) ठेवलेली बाटली असायची. रोजच्या वापरासाठी रॉकेल एका डब्यात काढलेलं असायचं आणि त्याच्याच शेजारी आणखी एका छोट्या डब्यात असायची (चावी ब्रँडची) काडेपेटी. आजोबा होते तेव्हा पहाटे उठल्यानंतर ते पहिल्यांदा या हंड्याखालच्या चुलीत विस्तव करायचे. हा विस्तव झाल्यानंतर ऊब मिळणार म्हणून मांजरंही त्यांच्या पायाशी घुटमळत असायची. अर्थात दिवसभरातही कधी समजा मांजरं घरात दिसली नाहीत, तर ती हमखास या चुलीजवळ, काहीवेळा विस्तव नसताना तर अगदी चुलीतल्या ऊबदार राखेतही बसलेली सापडायची... कारण पाण्याचा हंडा मोठा असल्यानं ही चूलही मोठी होती आणि त्यात मांजरांना अगदी सहज जाता यायचं... चुकला फकीर मशिदीत सापडतो...तशी ही चुकलेली मांजरं चुलीजवळ सापडायची...

सततच्या धगीनं हा हंडा अगदी काळा-कुळकुळीत झालेला होता आणि त्यामागची भिंतही. हंड्यावर एक लाकडाचं झाकण होतं. या हंड्याच्या मागेच एक खिडकी आणि त्याच्या बाहेरच वाडा (म्हणजे गोठा) होता. आणि अगदी नेमकं सांगायचं झालं, तर त्या खिडकीच्या बाहेर सहसा म्हशीचं रेडकू बांधलेलं असायचं. त्यांना तिथून आत हंड्याकडे बघण्यात कोण इंटरेस्ट असायचा. गवत खाणं आणि रवंथ करण्यापलीकडे जेव्हा मोकळा वेळ असेल, तेव्हा ती रेडकं खिडकीत तोंड घालून आत हंड्याकडे पाहत बसलेली असायची.

आम्हा मुलांच्या आंघोळी हमखास उशिरा व्हायच्या. त्यामुळे आम्ही आंघोळीला जायच्या वेळेस चुलीखाली पुन्हा विस्तव घालणं, हंड्यात पाणी भरणं असा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आंघोळीला प्रत्यक्ष सुरुवात व्हायची. हंड्यात भरपूर पाणी राहत असूनसुद्धा ते कधी संपून जायचं, ते कळायचंच नाही. मग आणखी गरम पाण्यासाठी पुन्हा हंड्यावर भर घालून ते तापण्याची वाट बघताना, दुसऱ्या बाजूच्या दरवाज्यातून येणारी वाऱ्याची थंड झुळूक ओलेत्या अंगावर शहारा आणायची. पण गरम पाण्याची अशी वाट बघण्यात एक मजा होती आणि विस्तव छान पेटलेला असेल त्यासाठी पाच-सात मिनिटांपेक्षा जास्त थांबायलाही लागायचं नाही. अर्थात, कधीकधी मात्र ओलं लाकूड असेल किंवा आंघोळीचं पाणी चुलीत उडालं असेल, तर सगळीकडे धूर व्हायचा. त्याचा वैताग यायचा, पण मग आई, काकू किंवा आत्या कोणीतरी येऊन चांगला विस्तव करून द्यायच्या. मग पुन्हा तांब्या-तांब्याने अख्ख्या हंडा अंगावर रिकामा करायला आम्ही मोकळे. दसरा, नवान्न पौर्णिमेच्या दिवशी इतर सगळ्या ठिकाणांप्रमाणे हंड्यालाही नवं बांधलं जायचं. नरकचतुर्दशीच्या दिवशी याच हंड्याच्या साक्षीनं नरकासुराचा वध करून (कारीट फोडून) अभ्यंग स्नान व्हायचं. माझ्या मुंजीच्या वेळीही मला याच हंड्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली गेली होती.

यावेळी गणपतीत गेलो, तेव्हा या हंड्याची जागा एका बंबाने घेतलेली दिसली. तो आकाराने मोठा असल्यानं आईनं अगड’बंब’ अशा शब्दात त्याचं वर्णन केलं. आत लाकडं घालून विस्तव करून बंब बंद केला, की अगदी थोड्या वेळात पाणी गरम आणि तेही थेट नळाने बादलीत यायची सोय. उपसून घ्यायची तसदी नाही. वर असलेल्या पाइपनं धूर थेट कौलांतून बाहेर, त्यामुळे खोलीत धुराचा वैताग नाही. सगळं कसं एकदम टापटीप आणि व्यवस्थित आणि झटपट. पण या बंबात तापवलेल्या पाण्यानं आंघोळ करताना माझ्या मनात मात्र आठवणींचा आणि विचारांचा हंडाच जणू उघडला गेला.

विचार करता करता जाणवलं, की काही गोष्टी आणि व्यक्ती अशा असतात, की ज्यांचं अस्तित्त्व प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात असताना जाणवत नाही. पण त्यांचा सहवास संपल्यावर मात्र त्यांची अनुपस्थिती जरूर जाणवते. त्यावरूनच लक्षात येतं, की त्या गोष्टी किती उपयुक्त होत्या, त्यांच्याशी आपल्या भावना किती जोडलेल्या होत्या आणि त्या असताना आपण त्यांची दखलही घेत नव्हतो. आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे या हंड्यासारख्याच अनेक गोष्टी (आणि माणसंही) अशा आहेत की ज्यांच्याकडे उपयुक्तता असूनही केवळ आजच्या (तथाकथित) वेगवान युगाशी जुळवून घेता न आल्यामुळे आपण त्यांना कालबाह्य ठरवतो. काळाचा महिमा..... याशिवाय त्याला दुसरं काय म्हणणार? अशा प्रकारे होणारे हे बदल उपयुक्त असतात, किंबहुना उपयुक्तता याच निकषाने हे बदल घडवले जातात आणि त्यांची आवश्यकताही नसते असं नव्हे. पण ते बदल घडवताना आपण भावनांचा फारसा विचार करत नाही, हेही खरंच.

बंबाच्या तापलेल्या पाण्यानं आंघोळ करताना विचारांच्या शॉवरनेही मी न्हाऊन निघालो होतो. अर्थात असे बदल घडणं हाच जगाचा नियम आहे, हेदेखील पटलं आणि पुढच्या वेळी येऊ तेव्हा काय बदललेलं असेल, याचा आडाखा बांधत मी अंग पुसू लागलो.
- अनिकेत कोनकर
(पूर्वप्रसिद्धी : १३ सप्टेंबर २०११ http://manspandane.blogspot.com/2011/09/blog-post.html)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NYNJCO
Similar Posts
देशभक्तीचा अंगार फुलविणारा कीर्तन महोत्सव - रत्नागिरीतील ‘कीर्तनसंध्या’ कीर्तनाला साधारण किती गर्दी होऊ शकते? काही अंदाज? ५०-१००-२००... रत्नागिरीतील पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांची कीर्तने ऐकण्यासाठी दर दिवशी सुमारे पाच हजार जणांची उपस्थिती असते! ‘कीर्तन हे देव-धर्मापुरते मर्यादित असते,’ यासह अनेक समजुती या महोत्सवाने खोट्या ठरविल्या आहेत
कोकण टिकवूक व्हया...! कोकणात ‘बीच शॅक्स’ म्हणजे किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी झोपड्या उभारण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण तयार केले आहे. गोव्याप्रमाणेच त्या शॅक्समध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्याची शिफारस त्यात आहे; मुळात अशी शॅक्स उभारणे कोकणाच्या निसर्गासाठी आणि आणखी अनेक गोष्टींसाठी धोकादायक आहे. शिवाय तिथे मद्यविक्रीला परवानगी
आठवणीतलं गाव... कोकणातलं... धावतधावत गाडी पकडल्यानंतर गर्दीभरल्या गाडीत स्वतःला कसंबसं कोंबून टाकलं, की पावसाच्या सरीनं भिजलेल्या कपाळावर साचलेले घामाचे तेवढे थेंब रुमालाच्या टोकानं टिपताना गावाकडच्या आठवणींचा चित्रपट उलगडू लागतो...
निसर्गरम्य शबरीधाम... गुजरातच्या डांग जिल्ह्यातल्या सुबीर गावात शबरीधाम मंदिर आहे. श्रीरामांना शबरीने बोरं खाऊ घातल्याची जी कथा आहे, ती इथेच घडली असं मानतात. त्याच ठिकाणी हे मंदिर उभं आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language